पाठ १० – बैलपोळा
ऐका. वाचा.
सण बैलांचा
आज पोळा,
गोठ्यातील बैल
न्हाऊ घाला.
मखमली झुली,
रंगीत शिंगे,
कपाळी बांधली
रेशमी बाशिंगे.
ढवळ्या – पिवळ्या
सजले धजले,
गावभर बधा
मिरवू लागले.
आजच्या दिनी
नाही कामधाम,
पुरणपोळी खाऊन
नुसता आराम.
– धोंडीरामसिंह राजपूत
शब्दार्थ
न्हाऊ – घालणे
अंघोळ – घालणे
झूल – बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत व नक्षीदार कापड
बाशिंग – बैलांच्या डोक्याला बांधण्याचे आभूषण
दिन – दिवस
स्वाध्याय
प्र.१. एक वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) बैलांच्या सणाला काय म्हणतात?
उत्तर: बैलांच्या सणाला पोळा म्हणतात.
(आ) बैलांना कसे सजवले आहे?
उत्तर: अंगावर मखमली झुली घालून, शिंगे रंगवून, कपाळावर रेशमी बाशिंग बांधून बैलांना सजवले आहे.
(इ) बैलांची नावे कोणती आहेत?
उत्तर: ढवळ्या-पवळ्या ही बैलांची नावे आहेत.
(ई) बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात?
उत्तर: बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात.
प्र. २. शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
उदा., मखमली – झुली.
उत्तर:
ढवळ्या – पवळ्या
कपाळी – पुरणपोळी
शिंगे – बाशिंगे
सजले – धजले
कामधाम – आराम
प्र. ३. बैल गोठ्यात राहतात, तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा.
(अ) घोडा
उत्तर: तबेला
(आ) बाघ
उत्तर: गुहा
(इ) माकड
उत्तर: झाड
(ई) हत्ती
उत्तर: हत्तीखाना
(उ) मासा
उत्तर: पाणी
(ऊ) कासव
उत्तर: पाणी
प्र. ४. खालील शब्दांपासून अनेक शब्द बनवा.
उदा., कपाळी कळी, पाळी, पाक, पाकळी.
(अ) पुरणपोळी
उत्तर: पोळी, पोर, रण, पुरण
(आ) गावभर
उत्तर: भर, वर, गाव, रव, भरव, गार
प्र. ५. ‘जज’ अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा
(अ) कामधाम
(आ) पुरणपोळी
उत्तर:
(१) शेजारीपाजारी
(२) आरामविराम
(३) दिवसरात्र
(४) घरदार
(५) काबाडकष्ट
प्र. ६. ‘गावभर मिरवणे’ म्हणजे संपूर्ण गावातून फिरणं. खालील शब्दांना ‘घर’ हा शब्द जोडा आणि वाक्यांत उपयोग करा. सांगा.
उदा., बाबांनी पोतंभर धान्य आणलं.
उत्तर:
(१) तोंडभर – रंगपंचमीच्या दिवशी तोंडभर रंग लावतात.
(२) पिशवी – आईने पिशवीभर भाजी घेतली.
(३) हातभर – लग्नाला मुलीने हातभर मेंदी काढली.
(४) घरभर मुलांनी घरभर खेळण्यांचा पसारा केला.
प्र. ७. तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती पाच वाक्यांत लिहा.
उत्तर:
माझा आवडता प्राणी – कुत्रा
अनेक प्राण्यांमध्ये कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे. कुत्रा प्रामाणिक असतो. कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. माझ्या घरी एक कुत्रा आहे. त्याचे नाव ‘फायटर’ आहे. तो आमच्या सगळ्या आज्ञा पाळतो. तो आमच्या घराचे रक्षण करतो. तो रंगाने पांढरा आहे. त्याचे डोळे पाणीदार आहेत. शेपूट लहान आहे, पण ती हलवत ऐटीत चालतो. मी किंवा आई त्याला खायला दूध चपाती देतो. आठवड्यातून एकदा मटणही खायला देतो. अनोळखी माणूस घरी आला की, ‘फायटर त्याच्यावर भुंकतो. कधी कधी ‘फायटर’ माझ्याबरोबर खेळतो. फायटरचे मी खूप लाड करतो. फायटर मला अत्यंत प्रिय आहे.
खालील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरांपासून फुलांची नावे तयार होतात, ती शोधा व लिहा.
उत्तर:
(१) पारिजातक
(२) जाई
(३) जुई
(४) गुलछडी
(५) चाफा
(६) झेंडू
(७) सदाफुली
(८) गुलाब
(९) अबोली
(१०) कमळ
(११) शेवंती
(१२) मोगरा
(१३) जास्वंद