पाठ ५ – डराव डराव!
डराव डराव डराव डराव
का ओरडता उगाच राब?
पत्ता तुमचा नव्हता काल
कोठुन आला? सांगा नाव
धो धो पाउस पडला फार
तुटुंब भरला पहा तलाव,
सुरु जाहली अमुची नाव
आणिक तुमची डराव डराव!
बटबटीत डोळ्यांचे ध्यान
विचित्र तुमचे दिसते राव!
सांगा तुमच्या मनात काय?
ही घ्या छत्री, ही घ्या नाव
जा, गाठा जा, अपुला गाव
आणि थांबवा डराव डराव!
– ग. ह. पाटील
शब्दार्थ
तुडुंब भरणे – काठोकाठ भरणे
जाहली – झाली
आणिक – आणि
बटबटीत – मोठाले, विद्रूप
ध्यान – विशिष्ट रूप
गाठणे – पोहचणे
अपुला – आपला, स्वतःचा
स्वाध्याय
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) ‘डराव डराव’ आवाज कोण करतो?
उत्तर: ‘डराव डराव’ आवाज बेडूक करतो.
(आ) तलाव का भरला?
उत्तर: धो धो पाऊस पडल्यामुळे तलाव भरला.
(इ) बेडकाचे डोळे कसे आहेत?
उत्तर: बेडकाचे डोळे बटबटीत आहेत.
प्र. २. जोड्या जुळवा.
‘अ’ गट
(१) जोराचा पाऊस
(२) बेडकाचे मोठे डोळे
(३) पूर्ण भरलेला तलाब
(४) स्वतःच्या गावी परत जा
‘ब’ गट
(अ) गाठा अपुला गाव
(आ) धो-धो पाऊस
(इ) बटबटीत डोळे
(ई) तुडुंब भरला तलाव
उत्तर:
(१) जोराचा पाऊस – (आ) धो-धो पाऊस
(२) बेडकाचे मोठे डोळे – (इ) बटबटीत डोळे
(३) पूर्ण भरलेला तलाब – (ई) तुडुंब भरला तलाव
(४) स्वतःच्या गावी परत जा – (अ) गाठा अपुला गाव
प्र. ३. गोलातील शब्द वाचा. चित्रे ओळखा. त्यांच्या योग्य जोडा जुळवा.
उत्तर:
प्र. ४. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात?
उत्तर: पाण्यातून प्रवास करण्यासाठी जहाज, नाव, तरंग नौका, शिडाची होडी, पडाव इत्यादी साधने वापरतात.
प्र. ५. पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?
उत्तर: पावसात भिजू नये यासाठी आम्ही छत्री, रेनकोट, घोंगडे, इरले इत्यादी गोष्टी वापरतो.
प्र.६. निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
(अ) वाऱ्याने हालणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज
उत्तर: चुरचुर
(आ) उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज.
उत्तर: फडफड
(इ) तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज.
उत्तर: चुरचुर
प्र. ७. छत्रीचे चित्र काढा. रंगया.
वाचा. लक्षात ठेवा.
‘नाव’ हा शब्द या कवितेत दोन अर्थानी आला आहे.
नाव – वस्तू व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव.
नाव – होडी.